जळगाव समाचार डेस्क | २५ सप्टेंबर २०२४
राज्यात पुढील चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात आजपासून हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे, ज्यामुळे त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवसांत वादळी वारे, मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर देखील होईल. राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाची हजेरी राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

![]()




