पारोळ्यात बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सव ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार

0
190

 

विक्रम लालवाणी, पारोळा प्रतिनिधी

संपूर्ण खान्देशासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या पारोळ्यातील बालाजी महाराजांच्या ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ ३ ऑक्टोबरपासून होणार आहे. हा यात्रोत्सव १८ ऑक्टोबरपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बालाजी महाराज संस्थानच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी ही माहिती दिली.

यंदाच्या ब्रह्मोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ध्वज वहनाने उत्सवाची सुरुवात होईल. यानंतर दररोज विविध वाहनांचे दिंडी मिरवणुका पार पडणार आहेत. ४ ऑक्टोबर रोजी नागाचे वाहन, ५ ऑक्टोबर रोजी चंद्राचे वाहन, ६ ऑक्टोबर रोजी मोराचे वाहन, ७ ऑक्टोबर रोजी वाघाचे वाहन, ८ ऑक्टोबर रोजी घोड्याचे वाहन, ९ ऑक्टोबर रोजी हत्तीचे वाहन, १० ऑक्टोबर रोजी कल्पतरूचे वाहन, ११ ऑक्टोबर रोजी सूर्याचे वाहन, १२ ऑक्टोबर रोजी गरुडाचे वाहन, १३ ऑक्टोबर रोजी मारुतीचे वाहन आणि १४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक रथोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.

रथोत्सवानंतर १५ ऑक्टोबर रोजी अंगदाचे वाहन, १६ ऑक्टोबर रोजी इंद्रसभेचे वाहन आणि १८ ऑक्टोबर रोजी बालाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीने ब्रह्मोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी शहरातील लेझीम पथक, मशालवाले आणि मोगरी लावणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

पत्रकार परिषदेत माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांच्यासह तहसीलदार डॉ. उल्हासराव देवरे, पारोळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार, पारोळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण, महावितरणचे अभियंता विजय साहरे, बालाजी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, भवानी गडाचे अध्यक्ष डॉ. मंगेश तांबे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here