जळगाव समाचार डेस्क| १९ सप्टेंबर २०२४
लग्नानंतर किरकोळ कारणांमुळे होणाऱ्या भांडणांमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोटामुळे पती-पत्नी दोघांनाही मानसिक त्रास होतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन अत्यावश्यक असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या कक्षांची स्थापना प्रत्येक जिल्ह्यात करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, आणि जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी वनिता सोनगत उपस्थित होते.
बालविवाह आणि विधवा प्रथा रोखण्यासाठी समाज शिक्षणाची गरज
अद्यापही काही भागांत बालविवाहाचे प्रकार घडत असल्याचे दुर्दैव आहे. चाकणकर यांनी या प्रथा रोखण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, विधवांवर लादल्या जाणाऱ्या सामाजिक बंधनांवर बंदी घालून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कडक कायदे असतानाही काही ठिकाणी हे प्रकार गुपचूप घडतात. यावर निर्बंध आणण्यासाठी व्यापक लोकचळवळीची आवश्यकता आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करून त्यांना आत्मविश्वास मिळावा यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन चाकणकर यांनी केले.
शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आणि तक्रार पेटी अनिवार्य
महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समित्यांची स्थापना केली जात आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक पालक संघटना स्थापन करणे आणि तक्रार पेटी बसवणे अनिवार्य असून, या बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे चाकणकर यांनी अधोरेखित केले.
मुख्यमंत्री योजनादूतांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या योजना पोहोचणार
शासनाच्या योजनांचे लाभ घराघरांत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूतांची नियुक्ती करण्यात येत आहे. या योजनादूतांना योग्य प्रशिक्षण देऊन, महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या योजनांची माहिती घराघरांत पोहोचवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले.