(विक्रम लालवाणी) पारोळा, प्रतिनिधी
पारोळा परिसरात विद्युत तार चोरी करणारी टोळी अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
सांगवी ता. पारोळा गावाच्या शिवारात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पोलवरील अॅल्युमिनियम तारांची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने तातडीने सांगवी शिवारात गस्त घातली. त्यावेळी समाधान नारायण पाटील (रा. एरंडोल) या संशयित व्यक्तीला चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याच्याकडून चोरीचे साहित्य मिळाले. समाधान पाटीलने आपल्या इतर दोन साथीदारांची माहिती दिली, ज्यात रवींद्र अनिल मिस्तरी (रा. साईनगर, एरंडोल) आणि धनराज प्रकाश ठाकूर (रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे. हे दोघे पळून गेले होते, परंतु पारोळा पोलीसांनी त्यांचा तात्काळ शोध घेत दोघांना जेरबंद केले.
चौकशीत, या तिघांनी पारोळा आणि एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीतील पाच ठिकाणी अॅल्युमिनियम विद्युत तारांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याविरोधात पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत दोन गुन्हे आणि एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.