(विक्रम लालवाणी) पारोळा प्रतिनिधी
पारोळा नगरपरिषदेतर्फे गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील अकरा दिवसांपासून शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मोठ्या मिरवणुकीसह संपन्न होणार आहे.
शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन महावीर नगर लगतच्या तलावात केले जाते. यावर्षीही पारोळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाच्या चोहोबाजूंनी लोखंडी पाइप्स टाकून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळी सोयीसाठी चारही बाजूंनी प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
मुर्ती विसर्जनाच्या वेळेस मूर्ती व्यवस्थितरीत्या तलावात पोहोचवून मध्यभागी विसर्जन करण्याची जबाबदारी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. या तयारीचे निरीक्षण प्रशासक किशोर चव्हाण, संघमित्रा सदांनशिव, यामिनी जटे, टी.डी. नरवाडे, सुभाष थोरात, चंद्रकांत महाजन, किशोर चौधरी आणि इतर कर्मचारी यांनी केले.
तयारी दरम्यान कर्मचाऱ्यांकडून प्रत्याशिक देखील पार पडले, ज्यामुळे गणेश विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पडेल याची खात्री करण्यात आली.