जळगाव समाचार डेस्क | १५ सप्टेंबर २०२४
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करत ४१ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. वाढत्या चोऱ्या, दरोडे आणि संघटित गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना केल्या असून, या कारवाईमुळे उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात ‘टू प्लस’ नियमाचे पालन करीत दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तयार केलेल्या हिस्ट्रीशीटमुळे गुन्हेगारांची माहिती अद्ययावत ठेवली असून त्याच्या मदतीने तपास प्रक्रिया वेगवान झाली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांना शहरबंदी आणि गावबंदीचे आदेश बजावण्यात आले आहेत. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तडजोड न करता कडक पाऊल उचलले आहे.
पोलिसांनी घेतलेल्या निर्णयानुसार, १८ सप्टेंबरपर्यंत ४१ गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४ जणांचा समावेश आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सांगितले की, “पोलिस प्रशासन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असून, तडीपार, स्थानबद्ध आणि ‘एमपीडीए’सारख्या कठोर कायद्यांचा वापर करून ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.”
गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.