जळगाव समाचार डेस्क| १४ सप्टेंबर २०२४
गौरी-गणपती सणानिमित्त राज्य सरकारने जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ‘आनंदाचा शिधा किट’ वाटपाचा निर्णय घेतला असून, आजपासून (ता. १४) या किटचे वितरण सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेले शिधा संचाचे वाटप आता पुन्हा सुरू होणार आहे.
जिल्ह्यात एकूण ६ लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारक असून, त्यापैकी सुमारे ९३ टक्के कुटुंबांसाठी ५ लाख ९४ हजार शिधा संच मंजूर झाले आहेत. या किटमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर या संचाचे प्रती संच १०० रुपये सवलतीच्या दराने वाटप केले जाईल.
तालुकानिहाय वाटपाची माहिती:
जळगाव – ८४,४५८
पारोळा – २८,०८९
भडगाव – २५,०२२
धरणगाव – २८,७०८
मुक्ताईनगर – १७,७५४
एरंडोल – २३,६२८
बोदवड – १४,४१३
भुसावळ – ३७,२००
चाळीसगाव – ५९,०२७
अमळनेर – ४६,५००
चोपडा – ४२,७७०
यावल – ३६,८४०
रावेर – ३३,९११
सावदा – १७,५७७
जामनेर – ४५,२१२
पाचोरा – ४५,३१७
एकूण– ५ लाख ९४ हजार ५७ संच
सहायक पुरवठा अधिकारी रूपेश बिजेवार यांनी सांगितले की, “सर्व अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा शिधा किट ई-पॉस प्रणालीद्वारे वाटप केला जाईल. तालुकानिहाय संच वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि काही ठिकाणी आजपासून वितरण सुरू होईल.”