सातबारा उताऱ्यावर आईचे नाव अनिवार्य करण्याचा सरकारचा मोठा निर्णय; 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी…

0
58

जळगाव समाचार डेस्क| १४ सप्टेंबर २०२४

महायुती सरकारने सातबारा उताऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. येत्या 1 नोव्हेंबर 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे, ज्यामुळे आता सरकारी कागदपत्रांप्रमाणेच सातबारा उताऱ्यावरही आईच्या नावाचा समावेश होणार आहे.

नव्या नियमांनुसार, 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास, त्याच्या आईचे नाव लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वडिलांचे नाव लावणे अनिवार्य राहणार नाही. यापुढे सातबारा उताऱ्यात कुठलाही फेरफार करताना देखील आईचे नाव लावावे लागणार आहे. विवाहित महिलांना मात्र पती किंवा वडिलांचे नाव लावण्याचा पर्याय मिळणार आहे.

राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावातील काही त्रुटींचा अभ्यास करून त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. या प्रस्तावानुसार 1 नोव्हेंबर 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मातृत्वाचा सन्मान वाढणार असून महिलांचे हक्क अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here