पारोळा प्रतिनिधी
पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई करत १९ चोरीच्या मोटारसायकलींसह आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, किशोर संजय चौधरी (रा. तरवाडे, ता. पारोळा, ह.मु. सातपूर कॉलनी, नाशिक) हा नाशिक शहर व परिसरातून मोटारसायकली चोरी करून त्यांची विक्री कमी किमतीत करीत असल्याची गुप्त माहिती पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळाली होती. या माहितीनुसार, किशोर चौधरी हा पुन्हा मोटारसायकली विक्रीसाठी पारोळा पोलीस हद्दीत येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
यावरून पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ प्रविण पाटील, पोना संदिप सातपुते आणि पोकों अभिजित पाटील यांनी तत्काळ कारवाईस सुरुवात केली. साधारण तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर, १२ सप्टेंबर २०२४ रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात आरोपी किशोर चौधरीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने नाशिक शहर व परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिक शहर व परिसरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार आणि उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली.