जळगाव समाचार डेस्क| १३ सप्टेंबर २०२४
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील महत्त्वाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरात फूट पडली असून, त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्राम यांनी वडील आणि अजित पवारांवर टीकेचा जोरदार बाण सोडला.
“मी शांत आहे ते बरे आहे, नाहीतर माझ्याकडे दहा हात आहेत. मी शेरनी आहे,” असे आक्रमक विधान करत भाग्यश्री यांनी आपल्या पहिल्याच भाषणात वडील धर्मरावबाबा आत्राम आणि अजित पवारांवर निशाणा साधला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “तुमच्याकडे दुधारी तलवार असल्याचे तुम्ही म्हणत असाल तर मी देखील दुर्गा आणि चंडीचा अवतार आहे. मैदान आमचेच असेल आणि तिथे आम्हीच चौकार आणि षटकार मारणार.”
धर्मरावबाबा आत्राम यांचा विरोध असतानाही, भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, “शरद पवारांनी आमचे घर फोडले नाही, अजित पवार यांनी घर फोडले आहे. हा निर्णय पूर्णपणे माझा आहे.”
राजकीय घडामोडींच्या या नाट्यमय वळणामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या फूटीनंतर घडणाऱ्या राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.