जळगाव समाचार डेस्क | १२ सप्टेंबर २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रचूड आणि त्यांच्या कुटुंबासोबत घरात आयोजित गणेश पूजेत सहभाग घेतला आणि आरती केली. पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास यांनी त्यांचे स्वागत केले. या सोहळ्याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभागी होण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “सीजेआय न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभागी झालो. भगवान गणेश आपल्याला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करो.”
पूजेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड हे काही इतर लोकांसह भगवान गणेशाची आराधना करताना दिसले. या प्रसंगी पंतप्रधान मोदी महाराष्ट्राशी संबंधित पारंपरिक वेशभूषेत होते, ज्यामुळे या पूजेस अधिक महत्त्व प्राप्त झाले.