जळगाव समाचार डेस्क| ११ सप्टेंबर २०२४
शहरात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला भुसावळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ६ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुमित मनोहर पवार असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने, भुसावळ शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या पेट्रोलिंग दरम्यान, नॉर्थ रेल्वे कॉलनी भागात सुमित पवार हा गाडीतून गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला पिस्तूलासह ताब्यात घेतले.
या कारवाईत ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईचे नेतृत्व पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी केले असून, त्यांच्यासोबत पोलीस हवालदार कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, प्रविण भालेराव, आणि सचिन पोळ हे देखील उपस्थित होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.