लग्न मोडल्याच्या कारणावरून दोन गटात तलवारीने हल्ला; १२ जण जखमी

जळगाव समाचार डेस्क | ९ सप्टेंबर २०२४

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजीवनगरात शनिवारी रात्री लग्न मोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तुफान वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले असून तलवारी आणि दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील १२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यापैकी चार जणांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते.

शनिवारी रात्री उशिरा राजीवनगरात गवते, काळे, पोटे आणि दुलांगे कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे कारण पोटे कुटुंबातील एका तरुणीचे लग्न मोडल्यामुळे निर्माण झालेली नाराजी असल्याचे समजते. गवते कुटुंबातील जनार्धन गवते आणि काळे कुटुंबातील चैऱ्या ऊर्फ विक्की काळे यांच्यात शाब्दिक वाद झाला. विक्कीने जनार्धनच्या कानशिलात मारल्यानंतर हा वाद हाणामारीत बदलला. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबातील नातेवाईक घटनास्थळी आले आणि वाद विकोपाला गेला.

गवते, पोटे, काळे आणि दुलांगे कुटुंबीयांनी एकमेकांवर तलवारीने हल्ला केला तसेच महिलांनी एकमेकींवर दगडफेक केली. या हाणामारीत काही लोक गंभीर जखमी झाले. तासाभरानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि ठाणेदार काळे यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर राजीवनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोटे परिवारातील एका तरुणीचे लग्न दुलांगे कुटुंबाच्या नातेवाईकासोबत ठरले होते. मात्र, काही कारणांमुळे हे लग्न मोडले आणि तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरु होते. शनिवारी रात्री हा वाद विकोपाला जाऊन हाणामारीत बदलला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here