23 वर्षीय नराधमाने केला 6 वर्षाच्या मुलीचा विनयभंग; पब्लिकने तुडवत दिला पोलिसात…

जळगाव समाचार डेस्क | ८ सप्टेंबर २०२४

राज्यात (Maharashtra State) महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, बदलापूरमधील शाळेत घडलेल्या प्रकारानंतर आणखी एक संतापजनक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. एका ६ वर्षीय चिमुकलीचा २३ वर्षीय नराधमाने भररस्त्यात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी आरोपीला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. आरोपी देखील याच परिसरात राहणारा आहे. शनिवारी सायंकाळी मुलगी रस्त्यावरून एकटी जात असताना आरोपीने तिला बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मुलगी घाबरून रडू लागल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष त्याकडे गेले.

तत्काळ स्थानिकांनी हस्तक्षेप करून आरोपीला पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here