जळगाव समाचार डेस्क | ८ सप्टेंबर २०२४
नांदेड शहरातील खडकपुरा भागात घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. घरघुती वादातून मुलानेच आपल्या वडिलांच्या हत्येसाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी मुलासह इतर दोघांना ताब्यात घेतले असून, सुपारी घेणारा आरोपी फरार आहे.
1 सप्टेंबर रोजी नांदेडमधील शेख युनूस शेख पाशा यांची त्यांच्याच राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या खुनानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून सहा दिवसांत तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये शेख यासेर अरफात, जो मयत व्यावसायिकाचा मुलगा आहे, त्याच्यासह शेख अमजद शेख इसाक आणि योगेश शिवाजी निकम यांचा समावेश आहे. वडिल आणि मुलामध्ये घरगुती वाद कायम होत होते, ज्यामुळे वाद विकोपाला गेल्याने मुलाने वडिलांच्या खुनाचे षडयंत्र रचले.
शेख यासेर अरफात याने आपल्या मित्राला दोन लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांचा खून घडवून आणला. घटनेच्या रात्री मुलाने मुख्य गेट आणि बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवला होता. पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास आरोपींनी घरात प्रवेश केला आणि शेख युनूस शेख पाशा यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी त्या मार्गानेच पळून गेले. सकाळी मुलानेच पोलिसांना फोन करून वडिलांचा खून झाल्याची माहिती दिली होती.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खुनाचा गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन व्यक्ती घरात शिरताना दिसल्या, ज्यामुळे संशय शेख यासेर अरफात याच्यावर आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने वडिलांच्या खुनाचे षडयंत्र आखल्याची कबुली दिली.
या प्रकरणात सुपारी घेणारा मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.