जळगाव समाचार डेस्क | ६ सप्टेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील वाळू माफिया ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी (वय ३६, रा. कोळन्हावी, ता. यावल) याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यरत असलेल्या नाना कोळीवर महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अॅक्ट (MPDA) अंतर्गत कारवाई करून त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
नाना कोळीविरुद्ध भादंवि अंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने आणि पुन्हा गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवल्यामुळे फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी नाना कोळीला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या पथकाने नाना कोळीला ताब्यात घेतले असून, त्याला कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.