जळगाव समाचार डेस्क| २ सप्टेंबर २०२४
बैल पोळा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे, कारण शेती व्यवसायात बैलांचा मोठा वाटा असतो. या निमित्ताने शेतकऱ्यांचे साथीदार असलेल्या बैलांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी कोथळी येथे बैल पोळा निमित्त बैलांचे पूजन केले आणि त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला. यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, “आपला देश कृषीप्रधान असून, शेती ही अर्थव्यवस्थेची आधारस्तंभ आहे. शेतकरी बांधव आपल्या शेतात मेहनत घेऊन धान्य पिकवत असतात, त्यांना या कार्यात बैलांची अमूल्य साथ लाभते. बैल पोळा हा वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा आणि भुतदयेची शिकवण देणारा दिवस आहे.”
सालाबादप्रमाणे यंदाही वृषभ राजाचे पूजन करून त्यास पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला गेला, आणि शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना ॲड. खडसे यांनी वृषभ राजाकडे केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना सल्ला दिला की, सध्याच्या पावसाळी दिवसांत पशुधनावर येणाऱ्या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी आणि लसीकरण करून पशुधनाचे संरक्षण करावे.
या कार्यक्रमात मंदाताई खडसे, डॉ. प्रांजल खेवलकर, सरपंच नारायण चौधरी आणि इतर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.