जळगाव समाचार डेस्क| २ सप्टेंबर २०२४
मागील दोन दिवसांपासून अजिंठा पर्वतरांगेत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला आहे. या पूरामुळे जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील चार गावांमध्ये नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी या बाधित गावांना भेट दिली आणि मदतकार्याचा आढावा घेतला.
बाधित गावांमध्ये सध्या जीवितहानी अथवा पशुधनाची हानी झालेली नाही, मात्र वित्तहानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या परिसरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जामनेरचे तहसीलदार घटनास्थळी उपस्थित आहेत आणि मदतकार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य नागरिकांना दिले जात आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) पथक पुरामुळे बाधित गावांमध्ये मदतकार्य सुरू करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय, भुसावळ आणि चोपडा या भागांमध्येही SDRF पथक नियुक्त करण्यात आले आहे.
तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे हतनूर आणि वाघूर धरणातील पाणीपातळीवर लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार नदीतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्राच्या जवळ जाण्यास किंवा पशुधन नेण्यास मनाई केली आहे. आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी 02572217193 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.