मुंबईतील लालबागमध्ये बेस्ट बसचा थरार, 9 जण जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक…

 

जळगाव समाचार डेस्क| २ सप्टेंबर २०२४

 

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. गजबजलेल्या लालबाग परिसरात बेस्टची 66 क्रमांकाची बस अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमागील कारण एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालकाच्या स्टेअरिंगवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून राणी लक्ष्मीबाई चौक, सायनकडे जात असलेली बेस्टची 66 क्रमांकाची बस लालबागच्या गणेश टॉकीज परिसरात पोहोचली, तेव्हा बसमधील मद्यधुंद प्रवाशाने अचानक चालकाशी झटापट केली आणि स्टेअरिंग पकडले. या कृतीमुळे बसचे नियंत्रण सुटले आणि ती अनियंत्रित होऊन फुटपाथवर जाऊन धडकली. या अपघातात दोन मोटारसायकल, एक कार, आणि पादचारी गंभीर जखमी झाले.
या अपघातात 9 पादचारी जखमी झाले असून त्यातील 3 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जखमींना तात्काळ शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काळाचौकी पोलिसांनी मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, बस चालक आणि वाहक यांना काळाचौकी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.
या घटनेबाबत अधिक तपशील अद्याप उपलब्ध नसून, पुढील माहितीची वाट पाहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here