जळगाव समाचार डेस्क| २ सप्टेंबर २०२४
विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या सुसंस्कृत पुण्यात काय चाललंय? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (२ सप्टेंबर २०२४) सायंकाळी साडेनऊ वाजता गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांनी फक्त गोळीबारच केला नाही तर कोयत्यानेही हल्ला केला. या हल्ल्यात आंदेकरांवर तब्बल पाच गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठ परिसरात दोन जण उभे असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. वनराज आंदेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रारंभिक तपासात असे समोर आले आहे की, आंदेकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, परंतु त्यांच्या घरगुती वादातून नातेवाईकानेच ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेनंतर समर्थ पोलिस आणि गुन्हे शाखेने घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हा हल्ला नियोजित होता, अशी माहिती मिळत आहे. हल्लेखोरांनी चौकातील लाईट आधीच बंद केले होते आणि आंदेकर एकटे असल्याचे पाहून हल्ला केला. आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नसल्याचा फायदा घेत, तीन ते चार हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर गोळीबार केला आणि नंतर कोयत्याने हल्ला केला. घटनास्थळी पोलिसांनी तपासाची प्रक्रिया सुरू केली असून या थरारक हत्येने पुण्यात खळबळ माजवली आहे.