जळगाव समाचार डेस्क| ३१ ऑगस्ट २०२४
तालुक्यातील चिंचोली येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी काल राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यांनी प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
चिंचोली येथील प्रकल्पांतर्गत महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, अतिथीगृह, प्राध्यापक निवासस्थान, आणि अधिष्ठाता कार्यालय यांसारख्या विविध सुविधा उभारल्या जात आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे यांच्या सहकार्याने केली.
एचएससीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संदीप जैन आणि न्याती कन्स्ट्रक्शनचे विभागीय मुख्य अभियंता संदीप गाडेकर यांनी प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीची माहिती मंत्री महाजन आणि उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी बांधकामाची रचना, मांडणी, आणि दर्जाबाबत सविस्तर माहिती पुरवली. मंत्री महाजन यांनी प्रकल्पाच्या कामावरील समाधान व्यक्त करत पाणी, रस्ते, वीज, आणि कंपाऊंड वॉलसाठी २० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
प्रकल्प कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सादरीकरणात, प्रकल्पाच्या प्रगतीची आणि भविष्यातील योजनांची माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली. तसेच, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्वरूप कसे असेल याचे प्रतीचलचित्र (व्हिडिओ) देखील दाखवण्यात आले.
प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांसाठी स्वतंत्र कॉलनी उभारण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या पाहणीवेळी शासकीय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि अधिष्ठाता कार्यालयातील बांधकाम विभागाचे साहेबराव कुडमेथे आदी उपस्थित होते.