जळगाव समाचार डेस्क | २९ ऑगस्ट २०२४
सांगली जिल्ह्यातून एक मोठी घटना उघडकीस आली आहे. कबड्डीपटू अनिकेत तुकाराम हिप्परकर (२१) याच्या खूनप्रकरणी संशयित मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (२७), रा. मरगूबाई मंदिराजवळ, जामवाडी व जय राजू कलाल (१८), रा. पटेल चौक, सांगली या दोघांना स्थानिक पोलिसांनी अटक केली असून, चौघा अल्पवयीन युवकांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मृत तरुणाचे एका तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध आणि आधीच्या वादातून हा खून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे संशयितांपैकी एकाच्या नात्यातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, ज्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. यापूर्वीही २२ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दोघेही एकाच मंडळाचे खेळाडू असून, त्यांच्या मध्ये अंतर्गत मतभेद होते. आठ दिवसांपूर्वी पुन्हा एकदा झालेल्या वादातूनच मुख्य संशयिताने खून करण्याचा कट रचला.
मंगळवारी सायंकाळी मरगूबाई मंदिराजवळ या कटानुसार सहाजणांनी मृत तरुणावर हल्ला केला. हल्ल्यात त्याच्या पाठीवर, डोक्यावर आणि कंबरेवर वार करण्यात आले, ज्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. हल्ल्यानंतर सर्व सहाजण घटनास्थळावरून फरार झाले.
खून झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. गुन्हे प्रकटीकरणचे पथक शोध घेत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की संशयित नदीकाठाजवळ लपलेले आहेत. पाठलाग करून सहाजणांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार आणि हल्ल्यातील इतर पाचजण अल्पवयीन असल्याचे समोर आले. यानंतर चौघा अल्पवयीनांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
दरम्यान, चौकशीत जय कलाल या आरोपीचे आधार कार्ड मिळाल्यानंतर त्याला १८ वर्षे आणि पाच महिने पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला सुधारगृहातून ताब्यात घेतले गेले. मुख्य आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला चार दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हि कारवाई निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक केशव रणदिवे, प्रमोद खाडे, महादेव पोवार, अंमलदार विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदीप कुंभार, योगेश सटाले, पृथ्वी कोळी आदींच्या पथकाने केली.