जळगाव समाचार डेस्क। २९ ऑगस्ट २०२४
यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ बुधवारी सायंकाळी एक गंभीर अपघात टळला. यावल एसटी आगाराची बस क्रमांक एमएच २० बीएल-२४०५ भुसावळकडे जात असताना अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला घसरली. याच वेळी अचानक समोर एक म्हैस आल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस कडेला घेतली, मात्र खराब साईडपट्ट्यांमुळे आणि चिखलामुळे बसचा एक चाक चिखलात रुतले.
चालकाच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ निर्णयामुळे ७९ प्रवाश्यांचा जीव वाचला. अपघातात कोणतीही हानी झाली नाही. प्रवाशांना दुसऱ्या बसने भुसावळकडे रवाना करण्यात आले. स्थानिक प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घेतली असून, संबंधित रस्त्याच्या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.