जळगाव समाचार डेस्क| २८ ऑगस्ट २०२४
कडगाव-जोगलखेडा रस्त्यावर पुलाच्या अपूर्ण बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून संतोष यादव धनगर (वय ५५) या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संतोष धनगर हे कडगाव येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होते आणि शेती तसेच पशुपालनाचा व्यवसाय करून जीवन निर्वाह करत होते. मंगळवारी दुपारी ते आपल्या म्हशींना चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी परत येत असताना, रस्त्यावरील अपूर्ण पुलाच्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्याने त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात संतोष धनगर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संतोष धनगर यांना खड्ड्यातून बाहेर काढले. मात्र, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर संतोष धनगर यांच्या कुटुंबीयांनी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. संतोष धनगर यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.