जळगाव समाचार डेस्क। २७ ऑगस्ट २०२४
मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित आणि अनुभवी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली होती. त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सुहासिनी देशपांडे यांनी आपल्या अभिनय कौशल्यानं ‘देवकीनंदन गोपाला’, ‘पुढचं पाऊल’, ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘धग’, ‘माहेरचा आहेर’, ‘गड जेजुरी’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘बाईसाहेब’, ‘मानाचं कुंकू मानाचा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त ‘तुझं आहे तुझ्या पाशी’, ‘बेल भंडार’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘सुनबाई घर तुझंच आहे’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘चिरंजीव आईस’, ‘सासूबाईंचं असंच असतं’, ‘लग्नाची बेडी’ अशा नाटकांचे हजारो प्रयोगही केले आहेत.
सुहासिनी देशपांडे यांच्या निधनानं मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या वैकुंठ स्मशानभूमीत पार पडणार असल्याचं कळलं आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक हळवं पान नक्कीच हरपलं आहे.