जळगाव समाचार डेस्क| २४ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्रातील साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे महानिर्मितीचा 25 मेगावाट क्षमतेचा साक्री-1 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे राज्याची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता आता 428 मेगावाटपर्यंत पोहोचली आहे.
साक्री-1 प्रकल्पाचे काम मेसर्स गोदरेज आणि बॉयस यांनी अभियांत्रिकी खरेदी आणि उभारणी (EPC) तत्वावर पूर्ण केले आहे. प्रकल्पामध्ये क्रिस्टलाईन पद्धतीचे सौर पॅनेल वापरण्यात आले असून, वार्षिक 45.09 दशलक्ष युनिट्स वीज निर्मितीची अपेक्षा आहे. प्रकल्पाच्या कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर (CUF) 20.59 टक्के आहे.
या प्रकल्पामुळे साक्री-1 मध्ये 50 लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून, त्यातून उत्पादित वीज खुल्या बाजारात विकली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 52 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, एकूण प्रकल्प खर्च 93.12 कोटी रुपये आहे.
महानिर्मितीच्या साक्री येथील प्रकल्पांमध्ये सध्या 125 मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे. साक्री-1, साक्री-2 (25 मेगावाट), आणि साक्री-3 (20 मेगावाट) हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, साक्री “सोलर हब” म्हणून नावारूपास येईल.
महानिर्मितीने पॉवर ट्रेडिंग क्षेत्रातही आपली उपस्थिती वाढवली आहे. जुलै 2024 पासून, कंपनीने सेझ बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यासोबत 15 मेगावाट सौर वीज वितरणाचा करार केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी साक्री-1 प्रकल्पाच्या यशस्वी कार्यान्वयनाबद्दल महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनीही आपल्या टीमचे आणि मेसर्स गोदरेज एन्ड बॉयस च्या अधिकारी, अभियंत्यांचे कौतुक केले आहे.

![]()




