संतापजनक: अमळनेर तालुक्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 70 वर्षाच्या वृद्धावर गुन्हा दाखल…

जळगाव समाचार डेस्क। २३ ऑगस्ट २०२४

बदलापूर येथील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय मूकबधिर मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ७० वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. तिची आई अहमदनगर येथे मजुरीसाठी गेली होती. हा प्रसंग साधून गावातील संशयित आरोपी राजधर अंबर सैंदाणे (वय ७०) याने १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता पीडित मुलगी अंगणात खेळत असताना तिला घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घटनेनंतर गावातील एका महिलेने पीडित मुलीच्या आईला फोनद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर तिची आई तातडीने घरी परतली आणि २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर संशयित आरोपी राजधर सैंदाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे या करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीस कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here