जळगाव समाचार डेस्क। २२ ऑगस्ट २०२४
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वाढत्या पशुधन चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) मोठी कारवाई केली आहे. मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जिल्ह्यातील पशुधन चोरीचे गुन्हे शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मध्यप्रदेशातील धनोरा ता. सेंधवा, जि. बडवाणी येथील रेवलसिंग आर्या (पावरा) याला अटक करण्यात आली आहे.
दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेवलसिंग आर्या हा बकऱ्या चोरीच्या गुन्ह्यात सामील असल्याचे उघडकीस आले. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पो.उ.नि राहुल तायडे, पो.उ.नि गणेश वाघमारे, पो.उ.नि दत्तात्रय पोटे, श्रे.पो.उ.नि अनिल जाधव, पो.ह दिपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदिप चवरे, दिपक चौधरी यांचा समावेश होता.
पथकाने मिळालेल्या तांत्रिक विश्लेषणावरून रेवलसिंग आर्या मध्यप्रदेशातील अतिदुर्गम भागात असल्याचे निश्चित झाले. पथकाने तीन दिवस रात्र त्या भागात आपली ओळख लपवून चौकशी केली आणि शेवटी रेवलसिंग आर्या याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून भारडु, ता. चोपडा येथून चोरीस गेलेल्या ६ बकऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत इतर आरोपींचीही नावे निष्पन्न करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, आणि मा. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

![]()




