दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या अधीक्षिकेला ACB कडून रंगेहाथ अटक…

जळगाव समाचार डेस्क। २१ ऑगस्ट २०२४

राज्यात शासकीय विभागांमध्ये लाचखोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा घटनांमध्ये एक धक्कादायक घटना धुळे शहरात समोर आली आहे. धुळे येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी विभाग आणि भविष्य निर्वाह निधी विभागाच्या अधीक्षिका मीनाक्षी भाऊराव गिरी यांना शिक्षक दांपत्याकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. २०) रंगेहाथ अटक केली.

तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे महानगरपालिका हायस्कूलमध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन तसेच ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर करण्यात आले होते. शिक्षण संचालकांनी हे थकीत वेतन धुळे येथील अधिक्षक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु, हे वेतन तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला अद्यापही मिळाले नव्हते.

तक्रारदाराने वेळोवेळी अधीक्षिका मीनाक्षी गिरी यांच्याशी संपर्क साधून थकीत वेतन अदा करण्याची विनंती केली. परंतु, विविध कारणे देत अधीक्षिकेने तक्रारदाराच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. १५ ते २० दिवसांपूर्वी तक्रारदाराने पुन्हा एकदा गिरी यांची भेट घेऊन थकीत वेतन अदा करण्याची विनंती केली. यावेळी गिरी यांनी तक्रारदाराकडे थकीत वेतन अदा करण्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर, विभागाने सापळा रचला. मंगळवारी, दोन लाख रुपयांची लाच स्विकारताना मीनाक्षी गिरी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.

अटक करण्यात आलेल्या अधीक्षिका मीनाक्षी गिरी यांच्यावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, धुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेने लाचखोरीला आळा घालण्याची गरज अधोरेखित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here