(विक्रम लालवणी), प्रतिनिधी पारोळा
पारोळा शहरातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचा लवकरच समाधान होणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरळीत होईल, तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत दररोज पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या या जटिल समस्येच्या निराकरणासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन आणि जलकुंभाच्या कामाची उभारणी सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार चिमणराव पाटील आणि अमोल पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर शिंदे, पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन, नगर अभियंता सुमित पाटील, मक्तेदार प्रतिनिधी रंजन महाजन, प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी हेमंत कोल्हे, गजानन रबाडे, तुषार शिंपी यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत आमदार चिमणराव पाटील यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि लवकरात लवकर उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, आजअखेर या योजनेचे ७५ ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
आमदार चिमणराव पाटील यांनी वेळोवेळी योग्य पाठपुरावा करत पारोळा शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून ५३.७० कोटी रुपयांचे मंजुरीनंतर प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. या कामाच्या तातडीने सुरुवातीसाठी त्यांनी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या आणि या योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनीही सांगितले की, ऑगस्ट अखेरीस पाच ते सात दिवसांआड पाणी पुरवठा सुरू होईल आणि ऑक्टोबर अखेर दररोज पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या प्रयत्नांमुळे शहराच्या नागरिकांना लवकरच दररोज पाणीपुरवठ्याची सुविधा मिळणार आहे.