जळगाव समाचार डेस्क| १२ ऑगस्ट २०२४
रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील एका सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 51,000 रुपये असल्याचे समजते.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पाल ते खरगोन रस्त्यावर हॉटेल जय पॅलेस समोर एक इसम गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने कारवाई केली. पथकाने संशयित इसम तोफसिंग चतरसिंग चावला (27) वर्षे, रा. धसली, ता. झिरण्या, जि. खरगोण, मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले. इसमाच्या अंगझडतीत त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस आढळले.
या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियम, मुंबई पोलीस अधिनियम, आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करत आहेत.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, आणि गुन्हे शोध पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.