जळगाव समाचार डेस्क| ११ ऑगस्ट २०२४
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील केळझर येथे जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गणपत लक्ष्मण मराठे या गुराखीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली, जेव्हा गुराखी घरी परतला नाही. शनिवारी सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली आणि जंगलात गुराख्याचा मृतदेह सापडला.
वनपरिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथे कक्ष क्रमांक ४३१ मध्ये गुरे चराईसाठी गेलेल्या गणपत लक्ष्मण मराठे यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गुराखीचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
वनविभागाची तत्काळ मदत
मृतक गुराखीच्या कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर. वेलमे यांनी ३० हजार रुपये दिले. ही मदत गुराखीच्या पत्नीला सुपूर्त करण्यात आली. यावेळी पि.डब्लू. पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर आणि पि.डी. खनके, क्षेत्र सहाय्यक महादवाडी उपस्थित होते.
या घटनेमुळे केळझर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वनविभागाने अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.