केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा: जळगाव-जालना नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी…

 

जळगाव समाचार डेस्क| ११ ऑगस्ट २०२४

 

केंद्र सरकारने जळगाव ते जालना या १७४ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. या प्रकल्पासाठी अंदाजे ७१०५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, आणि या रेल्वेमार्गाचे काम पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा प्रस्ताव मागील वर्षभरापासून पंतप्रधान कार्यालयात प्रलंबित होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये या मार्गाचा अंतिम स्थानिक सर्वेक्षण (फायनल लोकेशन सर्वे) मंजूर झाला होता. या नव्या रेल्वेमार्गामुळे खानदेश आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहे.
या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि मराठवाड्याचे आराध्य दैवत श्री राजुर गणपती हे देखील रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे या रेल्वेमार्गाला धार्मिक व पर्यटनदृष्ट्या मोठे महत्त्व मिळणार आहे.
महत्त्वाचे रेल्वे स्थानके
या रेल्वेमार्गावर एकूण २२ स्थानके असणार आहेत. जळगाव, पहूर, अजिंठा, सिल्लोड, भोकरदन आणि जालना अशी प्रमुख स्थानके या मार्गावर येणार आहेत. या मार्गावरून गाड्या ताशी १६० किलोमीटरच्या वेगाने धावतील. याशिवाय, मार्गावर तीन लहान आणि १६० मोठ्या पुलांचा समावेश असेल.
पर्यटनाला मिळणार नवा प्रोत्साहन
या नव्या रेल्वेमार्गामुळे अजिंठा लेणी आणि राजुर गणपतीसारख्या पर्यटनस्थळांना अधिकाधिक पर्यटक आकर्षित होऊ शकतात. तसेच, या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या पर्यटन आणि धार्मिक महत्त्वाला नवा आयाम मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
संपूर्ण प्रकल्पासाठी मंजूर झालेली आर्थिक तरतूद आणि आगामी पाच वर्षांच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here