जळगाव समाचार डेस्क| १० ऑगस्ट २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आज मनसे कार्यकर्त्यांनी शेण, बांगड्या आणि टोमॅटो फेकून हल्ला केला. उद्धव ठाकरे यांचा ठाण्यातील ‘भगवा सप्ताह मेळावा’ आज पार पडणार असताना हा प्रकार घडला.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेने हा प्रत्युत्तरात्मक हल्ला केल्याचे मानले जात आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी मनसैनिकांनी घुसखोरी करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून मनसैनिकांची धरपकड सुरु केली असून सुमारे 50 ते 60 कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मनसेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर फुगे मारण्यात आले, तसेच त्यांच्या वाहनाच्या टायरजवळ सुपाऱ्या ठेवण्यात आल्या. गडकरी रंगायतन येथे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीची परिस्थिती निर्माण झाली.
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झाल्यानंतर मनसैनिकांनी थेट सभागृहात प्रवेश करून आंदोलन सुरु केले. यापूर्वी मुस्लिम समाजानेही मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते, ज्यामुळे तणाव वाढला होता.
या घटनांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे म्हणाले, “शिवसेनेला आव्हान देणारा अजून पैदा झाला नाही. हिंमत असेल तर समोर या. लोकसभेमध्ये जरी पराभव झाला असला तरी विधानसभेला भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही.”
या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.