जळगाव समाचार डेस्क। ९ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगार योजनेत प्रचंड प्रमाणात घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप भाजपा कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष महेश प्रकाश पाटील यांनी केला आहे. विविध तालुक्यातील एजंट्सनी १५०० ते २००० रुपये घेऊन खोट्या कामगारांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी महेश प्रकाश पाटील यांनी जळगाव कामगार आयुक्त विभागाने तत्काळ लक्ष घालून खरेखुरे गरजू कामगारांची नोंदणी करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास भाजपा कामगार मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि जळगाव कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“खोट्या कामगारांची नोंदणी थांबवून वास्तविक गरजू कामगारांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही ठाम आहोत. याबाबत योग्य कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ,” असे महेश प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.