जळगाव समाचार डेस्क। ९ ऑगस्ट २०२४
शहरातील गणपती नगर परिसरात गुरुवारी पहाटे एक दुर्दैवी घटना घडली आहे. १६ वर्षीय जिज्ञासा नरेंद्र निकुंभ, जी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती, तिचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर जिज्ञासा नेहमीप्रमाणे अभ्यास करून झोपली. पहाटे ५ वाजता, तिच्या आईने तिला क्लाससाठी उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु जिज्ञासा प्रतिसाद देत नव्हती. तिला खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
डॉक्टरांच्या मते, रात्रीच्या वेळी उलटी झाल्याने ती घशात अडकल्यामुळे तिचा श्वास गुदमरला आणि तिचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. जिज्ञासाच्या आकस्मिक मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचे नाव नरेंद्र निकुंभ असून ते शहरातील जीएसटी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
जिज्ञासाच्या अचानक झालेल्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान बहिण असा परिवार आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.