जळगाव समाचार डेस्क। ८ ऑगस्ट २०२४
म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ धावत्या काशी एक्सप्रेस खाली झोकून देत जळगाव (Jalgaon) येथील एका 24 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी 1 वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणीचे नाव प्रियंका अरुण गोसावी (वय 24, रा. एकनाथ नगर, मेहरूण परिसर, जळगाव) असे आहे. प्रियंका जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये एमसीएचे शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी ती महाविद्यालयात गेल्याचे कळले होते, मात्र आज दुपारी तिच्या आत्महत्येची घटना समोर आली.
रुळावरील गॅंगमनला ही घटना समजल्यावर त्याने तत्काळ स्टेशन मास्तरला माहिती दिली. रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रियंकाची बॅग, मोबाईल, महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आणि आधार कार्ड घटनास्थळी आढळले. यावरून तिची ओळख पटली.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोहेकॉ प्रदीप पाटील आणि पोकॉ मनोज पाटील घटनास्थळी पोहोचले. प्रियंकाच्या नातेवाईकांना सूचना देण्यात आली आहे आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रियंकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जीआरपी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
या धक्कादायक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, प्रियंकाच्या कुटुंबीयांना या घटनेने मोठा आघात झाला आहे.

![]()




