जळगाव समाचार डेस्क| ५ ऑगस्ट २०२४
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. गिरणा धरणाच्या वरच्या भागातील चणकापूर, पुनद, हरणबारी व ठेंगोडा हे प्रकल्प भरल्याने या चारही प्रकल्पांतून पाण्याचा मोठा विसर्ग गिरणा धरणात होत आहे. त्यामुळे गिरणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून रविवारी सायंकाळपर्यंत जलसाठा २०.१७ टक्के झाला आहे.
गेल्या सहा दिवसांत गिरणाचा जलसाठा ११.७४ टक्क्यांवरून २०.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच काळात गिरणाचा जलसाठा ३३.०५ टक्के होता. वरच्या भागातून जवळपास ३६,९७६ क्युसेक्स विसर्ग गिरणात सोडण्यात आल्यामुळे पुढील २४ तासांत धरणाच्या जलसाठ्यात २ ते ३ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
गेल्या पावसाळ्यात गिरणा धरण ५६ टक्केच भरल्याने धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचा साठा राखीव ठेवण्यात आला होता. यंदा पावसाचे महत्वाचे दोन महिने उलटले असून उर्वरीत दोन महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला तरच जलसाठ्यात वाढ होवू शकेल. दुसरीकडे चाळीसगाव तालुक्यातील लहान धरणेही कोरडी पडली आहेत.
दरम्यान, गिरणा धरणाच्या वरच्या भागात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अशी माहिती गिरणाचे उपविभागीय अभियंता विजय जाधव तसेच अभियंता हर्षल पिठे यांनी दिली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून गिरणा उगम क्षेत्रातील चणकापूर, ठेंगोडा, पुनद व हरणबारी हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्यांचा विसर्ग गिरणा धरणात होत आहे, ज्यामुळे गिरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. सध्यस्थितीत चणकापूर धरणातून १३,५२० क्युसेक्स, पुनद धरणातून ५,६०३ क्युसेक्स, ठेंगोडा धरणातून १७,०१७ क्युसेक्स, व हरणबारीतून ८४६ क्युसेक्स असा एकूण ३६,९७६ क्युसेक्स विसर्ग गिरणा धरणात येत आहे.
मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांत, म्हणजे ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान, नाशिक जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. ४ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर जिल्ह्याच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. या पावसामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.