जळगाव समाचार डेस्क| ३ ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित राजकीय नियुक्तीची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून ष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. याला आज पूर्ण विराम मिळाला असून, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी दोन कार्याध्यक्ष आणि जळगावसाठी महानगराध्याक्षाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. (Jalgaon)
जिल्ह्यात एका बैठकीत जिल्हाध्यक्षांचा राजीनामा घेऊन खळबळ उडाली होती. त्यामुळे आता यापाडावर नक्की कोण आपलं वर्चस्व वरिष्ठांसमोर दाखवू शकेल आणि पद मिळवू शकेल याची प्रतीक्षा जिल्ह्यासह राज्याला लागून होती. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने अधिकृतरित्या जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा केली असून यात जिल्हाध्यक्ष म्हणून चाळीसगाव येथील प्रमोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यासह जळगाव लोकसभा कार्याध्यक्षपदी शालिग्राम ओमकार मालकर यांची तर रावेर लोकसभा कार्याध्यक्षपदी वरणगाव येथील राजेंद्र विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबत जळगाव महानगर अध्यक्षपदी पक्षाचे अल्पसंख्यांक समुदायातील नेते एजाज गफ्फार मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, यासोबत, संग्राम सूर्यवंशी आणि सचिन पाटील या दोघांना जळगाव महानगर कार्याध्यक्ष हे पद देण्यात आले आहे.