अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क| ३१ जुलै २०२४

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील पूरपरिस्थितीवरून टीका केली. त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यातच आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेल्या मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते.
राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सातप व्यक्त करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यादरम्यान जय मालोकार याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण आता त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
दरम्यान जय मालोकर याच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी जय मालोकार याच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं म्हटलंय. सोबतच त्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृत मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावं असं आवाहनही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here