जळगाव समाचार डेस्क;
पुण्याला लागून असलेल्या तळेगाव एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे गर्भपाताच्या वेळी विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाल्यानंतर प्रियकराने आपल्या एका मित्रासह तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. हा सर्व प्रकार पाहून मृत महिलेची दोन्ही मुले रडू लागली म्हणून प्रियकराने या दोन्ही निरागस मुलांना नदीत फेकून दिले. मृत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस तपासात हा सगळा प्रकार उघडकीस आला.
(Jalgaon Samachar Update)
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या आईने 11 जुलै रोजी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिची 25 वर्षीय मुलगी आणि तिची दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना मृत तरुणीच्या मोबाईलवरून एक नंबर सापडला, ज्या नंबरवर प्रेयसीने अनेकदा फोन केला होता. हा मोबाईल क्रमांक गजेंद्र दगडखार नावाच्या व्यक्तीचा होता.
गजेंद्र याने केला खुलासा…
पोलिसांनी गजेंद्रला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. गजेंद्रने सांगितले की, मृत महिलेचे पतीसोबत मतभेद होते. त्यामुळे ती आई आणि दोन मुलांसह भाड्याने राहत होती. याच काळात अनैतिक संबंधामुळे महिला गरोदर राहिली. गजेंद्रने त्याचा मित्र रवींद्र गायकवाड याच्यासह महिलेला मुंबईतील कळंबोली परिसरातील गर्भपात केंद्रात गर्भपात करण्यासाठी पाठवले. तिची दोन्ही मुलंही तिच्यासोबत होती. दरम्यान गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर मृतदेह नदीत फेकून दिला
रवींद्रने गजेंद्रला त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूची माहिती सांगून दोन्ही मुलांसह मृतदेह घेऊन तळेगाव गाठले. येथे गजेंद्र आणि रवींद्र यांनी मिळून मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. हा सर्व प्रकार पाहून दोन्ही मुले रडू लागली, त्यामुळे दोघांनाही नदीत फेकून देण्यात आले. पोलीस तिघांचाही नदीत शोध घेत आहेत. यासोबतच ही घटना घडवण्यात गजेंद्र आणि रवींद्र यांच्याशिवाय अन्य कोणाचा हात होता का, याचाही तपास सुरू आहे.

![]()




