(विक्रम लालवाणी), प्रतिनिधी पारोळा
पारोळा येथील नविन वसाहतीत अशोक नगर परिसरात दि. १७ रोजी रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास बिबट्याचा (Leopard)संचार दोन व्यक्तींनी बघितल्याने नवीन वसाहतीत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील अमळनेर रस्त्यालगत असलेल्या नवीन वसाहतमध्ये या वसाहतीच्या एकीकडे वंजारी रस्ता, बाजूला बायपास महामार्ग, उजवीकडे अमळनेर रस्ता तर समोरून वसाहती अश्या चौरसात वसाहती निर्माण झाल्या आहेत. दरम्यान नवीन वसाहतीतील अशोक नगर येथे रात्रीच्या सुमारास कामावरून परतणाऱ्या पिता पुत्रांना बिबट्या दिसला, त्यानंतर त्यांनी लागलीच शेजारील परिसरात हि बाब निदर्शनास आणून दिली. मात्र बिबट्याच्या संचाराच्या बातमीने येथील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी रात्री परिसरातील म्हशींनी ओरडा ओरड केली होती. दरम्यान सकाळी १८ रोजी या नवीन वसाहतीमध्ये बिबट्याच्या संचाराची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दिनांक १८ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह याभागात भेट देत पाहाणी केली. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले कि, अशोक नगर या भागात बिबट्याने संचार केल्यामुळे नागरिकांच्या मनात मोठी भिती निर्माण झाली आहे. वनविभाग रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करून बिबट्या कडे लक्ष केंद्रित करणार असुन वसाहत मधील नागरिकांनी दक्ष राहून बिबट्याचा संचार होणार नाही, यासाठी फटाके फोडावेत व बिबट्या आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.