(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा
पारोळ्यातील बाजारपेठेत जिकडे तिकडे चिखलाचे साम्राज्य पसरले असून आज या चिखलामुळे एन.ई.एस गर्ल हायस्कुलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेली विद्यार्थ्यांनींची वृक्ष दिंडीला माघारी परतावे लागले आहे. या दिंडी सोबत असलेले शिक्षक सचिन पाटील यांना दिंडी का फिरवली असे नागरिकांनी विचारले असता त्यांनी सांगितले, यापुढे इतका चिखल आहे कि एखाद्या विध्यार्थ्यांनीचा पाय घसरून पडल्याने अपघात होऊ शकतो, म्हणून जोखीम न पत्करता आम्ही दिंडी अर्ध्यातुनच फिरवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा बाजारपेठेत अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी चिखलच चिखल झाला आहे. यासाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा नगर परिषदेच्या प्रशासनास अर्ज दिले, समक्ष भेटून सुध्दा या समस्येवर चर्चा केली. परंतु आज उद्या करत बाजारपेठेतील ही जटिल समस्या काही केल्या मार्गी लागत नाही. तरी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, तसेच बाजारपेठेतील एकमेव स्वच्छता गृहात अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईटची मागणी करण्यात येत आहे, परंतु याकडेही प्रशासन डोळे झाक करीत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी रोष व्यक्त करीत सांगितले की, या मागणीची त्वरित दखल घ्यावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या नागरिकांच्या मागणीसाठी मागणीचा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांनी एक होऊन लढा उभारावा असे आवाहन पारोळा व्यापारी असोसिएशन भाजीपाला मार्केट कमिटी, किरकोळ विक्रेते यांनी केले आहे.
बाजारपेठेत चालने सुध्दा अवघड झाले आहे या चिखलाचा सर्वाधिक त्रास हा स्त्रियांना होत आहे. स्त्रियांना चिखलातुन वाट काढने जिकरी चे झाले आहे, याची दखल प्रशासन कधी घेणार का? प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट तर पाहात नाही ना ? असा प्रश्न येथील कार्यकर्त्या ॲड. कृतीका आफ्रे यांनी विचारला आहे. या समस्येची त्वरित दखल घेतली गेली नाही तसेच एखाद्या नागरिकास या चिखलामुळे काही अपघात होऊन इजा झाल्यास सर्वस्वी नगरपरिषदेचे प्रशासक हे जबाबदार राहतील, असे येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड कृतीका आफ्रे यांनी सांगितले.