(विक्रम लालवणी) प्रतिनिधी पारोळा
पारोळा शहरात नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा ५.० अभियानास पारोळा वासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद बघावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून “एक मिनिटात एक हजार वृक्ष” लागवड अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ज्यात शहरातील विविध विद्यालय तसेच महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी शहरालगत असणाऱ्या वंजारी रस्त्यावरील टेकडीवर एकत्र येत एका मिनिटात एक हजार वृक्षाची लागवड केली.
यात शहरातील किसान महाविद्यालय,राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय,श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय,श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ,बोहरा सेंट्रल स्कूल, अँग्लो इंडियन उर्दू शाळा,जिल्हा परिषद शाळा या शाळांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी पर्यावरण दूत यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी “हरित शपथ” देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप औजेकर यांनी केले, तर राहुल निकम यांनी कार्यक्रमाचे नियोजनाची जबाबदारी पूर्णपणे बजावली.
तसेच श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाने पारोळा शहरात वृक्ष दिंडी काढली, त्याचबरोबर नगरपरिषदेच्या वतीने श्रीमती यामिनी जटे आस्थापना प्रमुख, व तुकडू नरवाडे प्र.आरोग्य निरीक्षक यांनी उपरोक्त उपक्रमात सहभागी झालेल्या शाळा, महाविद्यालयाचे, पर्यावरण दूतांचे आभार मानले. नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व त्यांचे अंतर्गत कर्मचारी व संगणक चालक आदी अधिकारी/कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. हजारो विद्यार्थी, वृक्षप्रेमी एकत्र पर्यावरणासाठी एकत्र आल्याने परिसर पर्यावरण प्रेमींनी खुलून गेला होता, या वृक्षांच्या संगोपनासाठी विशेष काळजी घेतली जाईल हे वृक्ष जगविणे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे नगरपरिषद समन्वयक अक्षय सोनवणे यांनी सांगितले.