जळगाव समाचार डेस्क;
सध्या रेल्वे (Railway) दुर्घटनांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. त्यात आज सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास पुन्हा एक घटना कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकातून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Mumbai)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.45 दरम्यान ठाकुर्ली स्थानकाजवळ लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाईनअरमध्ये अचानक आग लागली होती. यामुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक प्रवासी त्यांच्या सामानासहित गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होते. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
या घटनेमुळे कल्याणकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांवर परिणाम झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. मध्ये रेल्वेच्या अनेक लोकल सेवा या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. कसारा आणि कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मात्र या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.