जळगाव समाचार डेस्क;
भूसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर कठोर भूमिका घेत मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून याबाबतचा अहवाल पोलीस प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर सादर केला आहे.
भुसावळ शहरातील मरिमाता मंदिर परिसरात माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची त्यांच्या वाहनावर बेछुट गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सुर्यवंशी, बंटी पथरोड, विष्णू पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडित, करण पथरोड, नितीन पथरोड आणि अन्य तीन जण अशा एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संशयित आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तयार करून नाशिक येथील पोलीस महानिरिक्षकांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
अश्या अन्य घटनांना आळा बसावा आणि यासारखे अमानुष कृत्य करण्याआधी गुन्हेगारांनी कायद्याचा धाक बाळगावा यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाचे प्रयत्न दिसून येत आहेत.