महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

 

जळगाव समाचार डेस्क;

मुंबई (Mumbai) हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज येथे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 29 हजार कोटींहून अधिक किमतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे रिमोटद्वारे शुभारंभ, भूमिपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. गोरेगाव मधील नेस्को प्रदर्शन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे 10 लाख रोजगार निर्मिती होणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, मागील काही वर्षात मुंबई आणि परिसराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. येत्या काही वर्षात ती अधिक चांगली होईल. राज्यात विविध विकास प्रकल्प उभारले जात असून यामुळे रोजगारदेखील वाढत आहे. वाढवण बंदराला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून 76 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे दहा लाख रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आकर्षण केंद्र बनले असून केंद्र आणि राज्य सरकार अधिक वेगाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पर्यटनाचे हब बनावे
महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्राचे शेती क्षेत्राचे तसेच वित्तक्षेत्राचे शक्ती केंद्र आहे. पर्यटन क्षेत्राला येथे मोठा वाव असून हे पर्यटनाचे हब बनावे अशी अपेक्षा प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केली. देशातील नागरिकांना गतीने विकास हवा असून यात मुंबईसह महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्रातील नागरिकांचे जीवन अधिक दर्जेदार करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले सागरी किनारा मार्ग अटल सेतू अशा प्रकल्पांमुळे नागरिकांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले दहा वर्षांपूर्वी मुंबईत आठ किलोमीटर मेट्रो धावत होती आज ती 80 किलोमीटर धावत असून 200 किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आज भूमिपूजन होत असलेल्या मुंबईतील प्रकल्पांमुळे प्रवासाच्या वेळात वेळेत मोठी बचत होणार असल्याचे सांगून कनेक्टिव्हिटी वाढल्याने सर्वांना लाभ होणार असल्याचे श्री.मोदी म्हणाले. विविध तीर्थयात्रांमध्ये सुविधा वाढवणार असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान श्री.मोदी यांनी पंढरपूर वारीसाठी पालखी मार्ग लवकरच सेवेत येतील असे सांगितले. राज्यात युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती दिली जात आहे. याचा युवकांना मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले. राज्यात सर्वसामान्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर मागील दहा वर्षात देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे राज्यातही विविध विकास प्रकल्प पूर्ण होत असून विकासकामांना नवी गती मिळाली आहे. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील प्रत्येक योजनेला प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा पाठिंबा मिळतो आहे. उद्योगस्नेही राज्य अशी महाराष्ट्राची ओळख पुन्हा निर्माण होत आहे. आज भूमिपूजन होत असलेल्या प्रकल्पांचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होईल तसेच सुरक्षित, सुशोभित आणि भक्कम मुंबई घडवायची आहे त्यासाठी प्रधानमंत्री यांची साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पायाभूत सुविधांच्या जाळ्यांमुळे मुंबईचे चित्र बदलणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या पाठिंब्यामुळे मुंबईत विविध विकासकामे होत असून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल. 2018 साली राज्याने मुंबईत कोठेही एका तासात प्रवास करता येईल अशी कनेक्टिव्हिटी तयार करण्याचा संकल्प केला होता, आज भूमिपूजन होत असलेल्या प्रकल्पांमधून ते साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत होत असलेले विविध प्रकल्प हे पायाभूत सुविधांचे चमत्कार आहेत. या प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईचे संपूर्ण चित्र बदललेले असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कामांचे झाले भूमिपूजन व समर्पण….
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ.
कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प पायाभरणी.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला समर्पण.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 चे राष्ट्राला समर्पण
तुर्भे गति शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here