जळगाव समाचार डेस्क;
आसाममधील शिवसागर येथील एका खासगी शाळेतील रसायनशास्त्राच्या शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्या खराब शैक्षणिक कामगिरीबद्दल फटकारले म्हणून त्याच्या राग डोक्यात ठेवून, विद्यार्थ्याने शिक्षकाचा वर्गात भोसकून खून केला. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
55 वर्षीय राजेश बरुआ हे बेजवाडा शाळेत रसायनशास्त्राचे शिक्षक असण्यासोबतच व्यवस्थापकीय पदावरही होते. पोलिस सूत्रांनी शनिवारी सकाळी सांगितले की, शिक्षकाने त्याच्या अभ्यासाबद्दल आणि शैक्षणिक कामगिरीबद्दल त्याला फटकारले होते आणि त्याच्या पालकांना त्याला शाळेत आणण्यास सांगितले होते. यानंतर गणिताचा तास संपल्यानंतर तो शाळेतून निघून गेला आणि शाळेचा गणवेश बदलून परत सामान्य कपड्यांमध्ये आला. तो वर्गात शेवटच्या बाकावर बसला असताना शिक्षकाने त्याला वारंवार वर्ग सोडण्यास सांगितले आणि अचानक विद्यार्थ्याने त्यांच्यावर चाकूने अनेक वार केले. त्याने चाकू खिशात ठेवला होता.
या भीषण घटनेने आसाममधील शिवसागर शहर हादरले आहे. या भीषण घटनेचा साक्षीदार असलेल्या एका विद्यार्थ्याने मीडियाला सांगितले की, आरोपी शाळेबाहेर गेला आणि सामान्य कपड्यांमध्ये परत आला. तो वर्गात आल्यावर शिक्षकाने त्याला आधी शांतपणे निघून जाण्यास सांगितले, मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने शिक्षक त्याच्यावर ओरडू लागले.
साक्षीदार म्हणाला, “त्यांच्या प्रतिक्रियेने संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने चाकू काढला आणि त्यांच्या डोक्यात वार केले. त्याच्याकडे शस्र्त आहे हे आम्हाला माहीत नव्हते.
शिक्षक जखमी होऊन जमिनीवर पडले आणि रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी दिब्रुगड येथे नेण्यात आले, मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही.