जामनेर, जळगाव समाचार डेस्क;
सहा वर्षीय बलिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला ताब्यात देण्याच्या वादातून जामनेर पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या २३ संशयितांना मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. या सर्व संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश डी.एन. चामले यांनी दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांना पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक दीपक रोटे, सागर काळे यांनी पोलिस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत गावातून धिंड काढत नेले. बंदोबस्तात नेत असताना आरोपींना बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. न्यायालय परिसरात संशयितांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. आमच्या मुलांची सुटका करा, अशी मागणी करणाऱ्या महिलांना रडू आले होते. जमावाकडून पोलिस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस जखमी झाले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एलसीबीकडून जामनेर पोलिसांकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.