जळगाव समाचार | १६ नोव्हेंबर २०२६
जळगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या १५४ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपणारा श्रीराम रथोत्सव अर्थात जलग्रामोत्सवातील ‘श्री सरस्वती वहन’ सोहळा शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल पंचमी) भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यादरम्यान महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे व नगरसेविका ॲड. शुचिता अतुलसिंह हाडा यांच्या रामदास कॉलनी येथील निवासस्थानी रात्री ८.५० वाजता श्री सरस्वती वहनाचे आगमन झाले.
या निमित्ताने आयोजित पानसुपारी कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांनी श्री सरस्वती मातेचे व प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले.
मंत्रोच्चार, वेदघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत
श्री सरस्वती वहन निवासस्थानी दाखल होताच श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी आणि ब्रह्मवृंदांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. वेदघोष, मंत्रोच्चार, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण रामदास कॉलनी परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी महापौर दीपमाला काळे व नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी सहकुटुंब श्री सरस्वती वहनाची विधिवत पूजा करून महाआरती केली.
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, उपमहापौर मनोज चौधरी, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी श्री सरस्वती वहन व प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले.
याशिवाय जळगाव शहर महानगरपालिकेतील विविध नगरसेवक, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित भाविक आणि मान्यवरांचे पानसुपारी देऊन स्वागत करण्यात आले.
१५४ वर्षांची परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक स्नेह यांचा सुरेख संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या स्वागत सोहळ्याने श्रीराम रथोत्सवाच्या ऐतिहासिक परंपरेतील आणखी एका अविस्मरणीय पर्वाची नोंद केली.

![]()







